ड्युटीवरून घरी आलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या

जांजगीर (छत्तीसगड) : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील जांजगीर चंपा येथे एका महिला कॉन्स्टेबलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रानू धुर्वे असे आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मृत रानू धुर्वे यांचे पती देखील पोलीस दलात कार्य़रत असून त्यांचा प्रेम विवाह झाला होता.

महिला पोलीस कॉन्स्टेबल रानू धुर्वे या सारगाव पोलीस ठाण्यात कर्यरत होत्या. त्यांचे करौवाडी येथील सनी जोशी यांच्यासोबत 2011 मध्ये प्रेम विवाह झाला होता. लग्नानंतर ते दोघे जांजगीर येथे भाड्याच्या घरामध्ये रहात होते. त्यांना सहा आणि अडीच वर्षाची दोन मुले आहेत. रानू धुर्वे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला कॉन्सटेबल धुर्वे या काही दिवसांपूर्वीच एक महिन्याच्या सुट्टीनंतर कर्तव्यावर हजर झाल्या होत्या. सुट्टी दरम्यान त्या आपल्या दोन मुल आणि नातेवाईकांसह मनाली येथे गेल्या होत्या. तेथून आल्यानंतर पती सनी आणि रानू यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.

पतीसोबत होत असलेल्या वादा बद्दल रानू यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्याला सांगितले होते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास रानू यांना कोणाचातरी फोन आल्याने त्या लगेच घरी निघून गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रानू धुर्वे यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांचे पती ड्युटीवर होते. दुपारी दोनच्या सुमारास ते घरी गेले असता त्यांना घरातील खोलीमध्ये पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

कॉन्स्टेबल रानू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस रानू यांच्या पतीकडे देखील चौकशी करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त