‘मला ‘हसीना’ अन् ‘सुंदरी’ दोघी आवडतात अन् त्यांना देखील मी’, बहाद्दरानं एकाच मांडवात थाटामाटात केला त्यांच्याशी विवाह

छत्तीसगढ : वृत्तसंस्था – एकाच नवरदेवाने एकाच मांडवात दोन महिलांशी लग्न केल्याचे कधी ऐकिवात नाही. पण छत्तीसगडध्ये(chhattisgarh) असाच एक प्रकार घडला आहे. जिथे एकाने दोन मुलींसोबत एकाच वेळी लग्न केल्याचे समोर आले आहे. त्याने हे लग्न काही लपून-छपून नाही, तर दिवसा ढवळ्या अख्ख्या गावासमोर थाटामाटात केले आहे. सामान्यत: याप्रकारे दोन लग्न करण्याची घटना असामान्य असते. मात्र, हे तिघांचेही लग्न तिघांच्याही सहमतीने झाल्याची ही घटना दुर्मिळ आहे. त्यांच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हसीना आणि सुंदरी असे या दोन मुलीची नावे आहेत. हसीना ही 19 वर्षीय आहे तर सुंदरी ही 21 वर्षांची आहे. या दोघींनाही नवरदेव चंदू मौर्य आवडायचा म्हणून या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवून एकाच मंडपात चंदूशी लग्न केले आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात हे आगळे- वेगळे लग्न पार पडले आहे. यावेळी चंदू म्हणाला की, मला त्या दोघीही आवडतात. तसेच त्या दोघींनाही मी आवडतो. हे लग्न आम्ही गाववाल्यांच्या समोर आणि सहमतीने केले आहे. मात्र या लग्नात माझ्या एका पत्नीच्या घरचे सदस्य या विवाहात सामिल झाले नाहीत. या लग्नामधील सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे लग्न संपूर्ण गावासमोर पार पडले तसेच कुणीही या लग्नाला विरोध दर्शवला नाही.

हसीना व सुंदरी या दोघीनीही 12 वीची परिक्षा दिली आहे. बस्तर जिल्ह्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. जिथे सगळ्या गाववाल्यांच्या समोर याप्रकारचे लग्न पार पडले आहे. ते ही मोठ्या थाटामाटात. याप्रकारचा विवाह हिंदू विवाह अधिनियमांमधील एक अपराध आहे. याविरोधात अद्यापतरी कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.