लस उत्पादन क्षमता, रेमडेसिवीरची कमतरता अन् ऑक्सिजन बेड्सची संख्या यावर PM मोदी काही बोललेच नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री देशाला उद्देश्यून भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील कोरोनास्थिती, लसीकरण मोहीम आणि अन्य उपाययोजनांबाबत भाष्य केले. मात्र या भाषणात पंतप्रधानाकडून काही ठोस माहिती दिली गेली नसल्याची टीका छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस. सिंहदेव यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी लस निर्मिती संदर्भातील आकडेवारी, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड्स यासारख्या गोष्टींची माहिती दिली असती तर राज्यांना अधिक धीर मिळाला असता. रेमडेसिवीरचा पुरवठा, त्याचा होणारा काळाबाजार यासंदर्भात ते शब्दही बोलले नाहीत. पुरक प्रमाणात राज्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील याबद्दलही त्यांनी काही बोलले नाही, अशा शब्दात सिंहदेव यांनी नाराजी व्यक्त केली.

मंत्री सिंहदेव एएनआयशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधताना मला अपेक्षा होती की देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा करतील. तसेच लस निर्मितीची क्षमता कशी वाढवली जाणार आहे किंवा त्यानंतर राज्यांना किती प्रमाणात लसींचा पुरवठा केला जाणार आहे. यासंदर्भात ते महिती देतील असे वाटले होते. मात्र त्याबद्दल ते काहीच बोलले नसल्याचे सिंहदेव म्हणाले. दरम्यान देशात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देश कोरोनाशी पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, राज्यांनी लॉकडाउन टाळण्याचा प्रयत्न करावा. अखेरचा उपाय म्हणून लॉकडाउनकडे पाहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना दिला आहे. स्थलांतरित मजुरांनाही आश्वस्त करण्याचे आवाहन मोदींनी राज्यांना केले.