छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून जवानांची गाडी उडवली; सहा जवान शहीद

रायपूर : वृत्तसंस्था

छत्तीसगडमधील दंदेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत. हा हल्ला दंतेवाडा येथील छोलनार गावात जवानांच्या गाडीवर करण्यात आला असून, या भ्याड हल्ल्यात पाच जवानांचा जागीच, तर एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एक जवान जखमी आहे.

शहीद झालेल्या जवानांमध्ये छत्तीसगड सशस्त्र बलाच्या आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ मोर्चा सांभाळत सीआरपीएफने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरुवात केली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील सुकमा जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करत असलेल्या जवानांवर अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये नऊ जवान शहीद झाले होते. या हल्यात सुरुवातीला आयईडी ब्लास्ट करण्यात आला आणि नंतर जवानांवर गोळीबार करण्यात आला. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआरपीएफकडून संयुक्त सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. यावेळी नक्षलवादी देखील जवानांवर हल्ले करत आहेत.