छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ला झालेल्या भागात नियोजित तारखांना मतदान होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तासगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर निवडणूक आयोगाने येथे नियोजित तारखांना मतदान होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप आमदार भीमा मंडावी यांच्यासह ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर पाच पोलीस शहीद झाले. यानंतर ठरलेल्या वेळेप्रमाणे निवडणूक होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र निवडणूक आयोगाने ठरलेल्या तारखेलाच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नक्षलवादी हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेत लोकसभा निवडणुकीसाठी नियोजित तारखांना मतदान होईल हे स्पष्ट केले आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुरक्षितेची अधिक काळजी घेण्यात यावी असे निर्देश नक्षलवादी हल्ला झालेल्या जिह्याचे पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत. दंतेवाडा येथे पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला पार पडेल, मतमोजणी २३ मे रोजी होईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला ४८ तास उरले असतानाच छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला असून या हल्ल्यात मंडावी यांचा जागीच मृत्यू तर ५ जवान शहीद झाले. भीमा मंडावी यांचा ताफा श्यामगिरी गावातून परतत असतानाच आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या ताफ्यावर हल्ला चढवला.