मोदी, शहा, फडणवीसांपेक्षा प्रियंका आणि राहुल गांधी अधिक समंजस : छगन भुजबळ 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा समंजस कोणी असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधी आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नांदेड येथील सभेत ते बोलत होते.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचे उदाहरण देत भुजबळ यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, सुषमा स्वराज, देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रियांका गांधी यांच्याशी केली. जेव्हा पुलवामात हल्ला झाला त्यानंतर काही वेळातच प्रियंका गांधी यांची पहिली पत्रकार परिषद होती. ती त्यांनी रद्द केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पावणेसहा वाजता सभा घेत होते. योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतली, तर अमित शाह यांनीही सभा घेतली आणि आमचे मुख्यमंत्री युतीच्या वाटाघाटी करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. आता मला सांगा समंजस कोण आहे?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी यावेळी विचारला.

जेव्हा २०१४ च्या निवडणुकांचा प्रचार सुरु होता तेव्हा भारतीय सैन्याचे पाच जवान शहीद झाले. त्यावेळी देशाच्या पंतप्रधानपदी जर नरेंद्र मोदी असते तर आपण लाहोरपर्यंत जाऊन पाकिस्तानला उत्तर दिले असते, असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. तर देशाच्या पंतप्रधानपदी असा माणूस आहे जो मौन बाळगून आहे त्यामुळे पाकिस्तानची हिंमत वाढली आहे, अशी टीका परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली. या वक्तव्यांचा हवाला देत राहुल गांधी समंजस असल्याचे म्हटलं.

१४ फेब्रुवारीला जेव्हा पुलवामात हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी म्हटले की देशावर संकट आलं असल्याने आम्ही सरकारसोबत आहोत. या सरकारला आम्ही सर्वतोपरी साथ देऊ. राहुल गांधींनी जी परिपक्वता दाखवली ती भाजपाच्या एकाही नेत्याने दाखवली नाही, असं म्हणत भुजबळ यांनी राहुल गांधींचे कौतुक करत भाजपवर टीका केली.