छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तडीपार छिंदम विजयी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना करावा लागला असला तरी नगरच्या जनतेने मात्र त्याला स्वीकारले आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाला आहे.विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला आहे.

पहिल्या काही फेऱ्यांत पिछाडीवर असलेल्या छिंदमने नंतर आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने विजय मिळविला. श्रीपाद शंकर छिंदम प्रभाग ९ (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष निवडणूक लढवत होता.  या मतदारसंघात चार फेऱ्यांनंतर मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडी घेतली होती. मात्र, नंतर सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली.  त्याची ही आघाडी तेराव्या फेरीनंतर १८५० मतांपर्यंत पोहोचली आहे.  या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी ), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

 ज्या भाजपने छिंदमला केली हकालपट्टी त्याच भाजपच्या उमेदवाराला छिंदमने पराभूत-
छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाईलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप मोबाईलवर व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करीत त्याचा उपमहापौरपदाचाही राजीनामा घेतला होता. ज्या भाजप पक्षाने छिंदमला निलंबित केलं, त्याच भाजपच्या उमेदवाराला छिंदमने पराभूत केले आहे. प्रदीप परदेशी हा भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे.

छिंदमची पत्नी पराभूत-
श्रीपाद छिंदमची पत्नी स्नेहा या प्रभाग १३ (क) मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्याविरोधात निलम गजेंद्र दांगट (राष्ट्रवादी) गायत्री नरेंद्र कुलकर्णी (भाजप), सुवर्णा संजय गेनाप्पा (शिवसेना), सुनीता शांताराम राऊत हे रिंगणात होते. येथे शिवसेनेच्या गेनाप्पा विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे.