गँगस्टर छोटा राजनला सत्र न्यायालयाचा दणका, अन्य तिघांसह ठोठावली 2 वर्षांची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पनवेलमधील एका बांधकाम व्यावसायिकाला 26 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन आणि अन्य तिघांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे छोटा राजनच्या शिक्षेत वाढ झाली आहे. छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता.

या प्रकरणातील माहितीनुसार, बिल्डर वाजेकर यांनी 2015 मध्ये पुण्यात जमीन खरेदी केली होती. विक्रीच्या भाग म्हणून परमानंद ठक्कर नावाच्या एजंटला 2 कोटी रुपयांचे कमिशन दिले होते. ठक्कर यांनी मात्र कमिशन म्हणून अधिक पैशांची मागणी केली. ती रक्कम देण्यास वाजेकर यांनी नकार दिला. होता. त्यानंतर ठक्कर यांनी छोटा राजन याच्याकडे संपर्क साधला असा आरोप आहे. त्यानंतर छोटा राजनने आपल्या माणसांना वाजेकर यांच्या कार्यालयात पाठवून 26 कोटींची मागणी केली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सदस्यांनी बिल्डरला जिवे मारण्याची धमकीही दिली होती.