पार्सलमधील खाल्लं चिकन, डिलिव्हरी बॉयच्या मुलाचा मृत्यू; पोलिसांनी तपास केला अन्…

जकार्ता : वृत्त संस्था – डिलिव्हरी बॉय म्हटले त्याचं काम आपल्याला लगेच समोर येतं. कोणत्याही गोष्टी संबंधित लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे त्याचं मुख्य काम. आपल्याकडे असलेल्या सर्वच वस्तू डिलिव्हरी बॉय पोहोचवण्याचे काम करत असतो. मात्र, जर त्याच्याकडे कोणी पार्सल घेतलेच नाही तर हा प्रश्न असतो आणि तो थेट ते पार्सल आपल्या ऑफिसमध्ये जमा करतो. पण एक पार्सल तो घेऊन आला अन् भलताच प्रकार घडला.

इंडोनेशियात बंदीमन हा एक पार्सल पोहोचवणारा कर्मचारी आहे. 25 एप्रिलला त्याला एक पार्सल पोहोचवण्याचे काम मिळाले होते. पण ते पार्सल कोणीही न स्वीकारल्याने तो ते पार्सल घेऊन घरी आला. त्या पार्सलमध्ये चिकन होते जे बंदीमनचा 10 वर्षांचा मुलगा नबा फैज प्रस्तेया आणि बंदीमनची बायको या दोघांनी इफ्तारमध्ये खायचे ठरवले होते. हे चिकन खाल्ल्यानंतर मुलगा आणि बायकोला उलट्या झाल्या. दोघांची प्रकृती बिघडायला लागली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दोघांवर उपचारही करण्यात आले. मात्र, नबा फैज प्रस्तेयाचा मृत्यू झाला.

चिकनवर शिंपडले होते सायनाईड

नानी एप्रिललियानी नूरजमान नावाच्या महिलेने योग्यकार्ता भागातील टॉमीसाठी हे पार्सल पाठवले होते. नानी आणि टॉमीचे प्रेमसंबंध होते. जेव्हा टॉमीने भलत्याच तरुणीशी लग्न केल्याने नानी संतापली होती. त्याला ठार मारण्यासाठी तिने चिकन तयार करून त्यावर सायनाईड शिंपडले होते. मात्र, पार्सल टॉमीच्या घरी पोहोचले तेव्हा तो घरी नव्हता. त्याच्या बायकोने दरवाजा उघडला होता. काहीही मागवलेले नसताना हे पार्सल घरी आल्याने टॉमीच्या बायकोने ते घेतले नाही. त्यावेळी टॉमीच्या बायकोने बंदीमनला सांगितले की पार्सलमधील गोष्ट तूच उघड आणि इफ्तारसाठी खा, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले.