‘INX Media’ घोटाळा : जामीन नाकारताच पी. चिदंबरम ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा ‘आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणी जामीन फेटाळल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची भीती आहे. मात्र अटकेच्या भीतीने ते बेपत्ता झाले असून त्यांचा फोन देखील बंद लागत आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक त्यांचा शोध घेत असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पी. चिदंबरम यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आता चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्याची गरज असल्याचे म्हटले होते. चिदंबरम हे चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले होते. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रंजन गोगोई काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल हे त्यांच्या वतीने कोर्टात त्यांची बाजू मांडणार आहे. काल हायकोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर चिदंबरम यांनी विविध काँग्रेस नेत्यांची भेट घेत याप्रकरणी चर्चा केली. मागील वर्षी हायकोर्टाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. मात्र आता या निर्णयाने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून या प्रकरणी केंद्रीय संस्थांचे हात बांधता येणार नसल्याचे मत या प्रकरणी निर्णय देताना न्या. गौर यांनी म्हटले. त्याचबरोबर या चौकशीत चिदंबरम हेच सूत्रधार असल्याचे दिसून येत असल्याने त्यांचा जमीन अर्ज रद्द करत असल्याचा निकाल त्यांनी दिला. त्यामुळे आता अंतिम दिलाश्यासाठी चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

निवृत्त होण्याच्या दोन दिवस आधी निकाल

या खटल्यात निकाल देणारे न्या. सुनील गौर हे दोन दिवसानंतर आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. याआधी देखील त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे न्या. गौर यांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यांत निकाल दिला आहे.

दरम्यान, काल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिम्मित त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतिस्थळी चिदंबरम गेले होते. मात्र त्यानंतर त्यांना अटक होणार असल्याची माहिती मिळताच ते बेपत्ता झाले असून त्यांचा फोनदेखील बंद लागत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –