सरन्यायाधीशांवर आरोप करून त्यांना हटविण्यासाठी कारस्थान

कारस्थान असेल तर मुळापर्यंत जाऊ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना याप्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा एका वकीलाने केला असून यात एका कॉर्पोरेट हाऊसचा हात असल्याचे सांगितले आहे. अ‍ॅड. उत्सव बैंस यांनी याप्रकरणाचे पुरावे लिफाफ्यात बंद करून न्यायालयाला सादर केले आहेत. त्यानंतर याप्रकरणात जर कटकारस्थान सुरु असेल तर त्याच्या मुळापर्यंत जाऊ असे न्या. अरुण मिश्रा यांनी म्हटले आहे.

वकील उत्सव बैंस यांनी सुनावणी दरम्यान तपास यंत्रणांच्या प्रमुखांना भेटण्याची मागणी केली होती. त्यानंतर खंडपीठाने अटर्नी जनरल केके वेणूपाल यांच्याशी बोलून जबाबदार तपास अधिकाऱ्याला चेम्बरमध्ये बोलविण्यास सांगितले. हा प्रकार खरा असेल तर खुप गंभीर आहे. त्यानंतर बैंस यांनी न्यायालयात बंद लिफाफा न्यायालयासमोर सादर केला. त्यावेळी ते म्हणाले की दोघेजण मला भेटले होते. त्यांनी आरोप करणाऱ्या महिलेची बाजू मांडण्यासाठी दीड कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यासोबतच यासंदर्भात महिलेची बाजू मांडण्यासाठी प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यास सांगितले होते. एका विश्वसनीय सुत्राने सांगितले की, एका बड्या कंपनीच्या व्यक्तीने आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाशी संपर्क केला होता. परंतु तो अयशस्वी झाल्याने त्याने त्या न्यायाधिशाची बदली करण्याचा प्रयत्न केला होता.