राज्यपालांच्या बैठकीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ‘दांडी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोना संकटाला तोंड देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची तक्रार करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्यपालांनी तातडीने कोरोनाविषयक आढावा बैठक बोलावली. मात्रा, बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवत भाजपच्या राजकारणाला सूचक उत्तर दिले.

कोरोना आव्हानाचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल रात्राीआढावा बैठक बोलावली. या बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्षात मात्रा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीस गेलेच नाहीत.

इतकेच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारच्या एकाही मंत्र्याने या बैठकीस उपस्थिती लावली नाही. मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत याची व्यवस्था करण्यात आली. बैठकीला दांडी मारत राजभवन-भाजप यांच्यामार्फत होणार्‍या राजकारणाला ठाकरे यांनी सूचक उत्तर दिले. त्याशिवाय स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना बैठकीला पाठवत, तेथील घडामोडींवर नजर राहील, अशी व्यवस्था केली.

विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून राज्यपालांकडे जाऊन त्यांची भेट घेत राजकीय शिष्टाचाराचे पालन केले. पण भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून राजभवन बैठक लावत असेल तर त्या राजकारणाला प्रत्युत्तर देऊ असेच ठाकरे यांनी यातून दाखवून दिल्याचे मानले जात आहे.