साहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्यमंत्री येणार

यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाइन – ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यवतमाळ येथील उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, कार्यवाह प्रा. घन:श्याम दरणे आणि समन्वयक अमर दिनकर यांनी ११ डिसेंबर रोजी मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले. यावेळी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी संमेलनाच्या कार्यप्रगतीबाबत विचारपूस करून संमेलनाला निश्चित येणार असे सर्वांना सांगितले. साहित्य संमेलनाला येणे हा आमच्या खात्याचाच एक भाग आहे म्हणून माझेही येणे निश्चित आहे असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आयोजकांना सांगितले. शासनाकडून मिळणारे अनुदान संमेलनाच्या खात्यात जमा झाल्याचे कार्याध्यक्षांनी सांगितले व त्याबद्दल आभारही मानले.

याशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी पर्यटन मंत्रालय आणि माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रसिद्धी व्हावी, अशी विनंती आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास लगेच अनुमती देऊन सचिवांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्री या सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय ठरला आहे आणि त्यासाठी ही मंडळी उपस्थित राहणार हे निश्चित झाले आहे.