‘आम्ही कदापि संविधानाच्या विरोधात काम करणार नाही’ : मुख्यमंत्री

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा होत असली तरी मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी करण्याची गरज नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ज्या संस्कृतीने आक्रमणे पचवली त्याच सांस्कृतिक जगतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाद झाले. हे वाद गरजेचेही आहेत. मात्र काळजी करावी अशी परिस्थिती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ते शनिवारी बोलत होते. आपण संविधानाच्या विरोधात काम करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

नाट्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास काही कामानिमित्त मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी शनिवार 23 रोजी सायंकाळी 7 वाजता आवर्जून उपस्थित राहून राम गणेश गडकरी नगरीत साजर्‍या होत असलेल्या 99 व्या नाट्य संमेलनात रंगकर्मी आणि नागपूरकरांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आम्ही समतेचे पाईक आहोत. मात्र ज्या कुणाविरुद्घ देशविरोधी कारवायांचे पुरावे मिळतील त्यांच्यावर कारवाई करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आम्ही कदापि संविधानाच्या विरोधात काम करणार नाही. त्यामुळे सहिष्णुतेसंदर्भात सरकारबद्दल गैरसमज नसावा.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगतिलं.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील नाट्यचळवळीची आणि नागपूरकर रसिकांची तोंडभर स्तुती केली. ते म्हणाले, “विदर्भाची नाटकाची भूक ही कायम आहे. झाडीपट्टी जोपासण्याचे काम विदर्भातील कलाकार करीत आहेत.मराठी रंगभूमी ही समृद्ध आहे. त्यासाठी रसिकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. 34 वर्षानंतर नागपुरात नाट्य संमेलन होत आहे. पुढील वर्ष हे 100 वे आहे. जर 100 वे नाट्यसंमेलन भरविण्याची संधी दिली तर नागपूरकर निश्‍चितच त्याचे स्वागत करतील” असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी शतकोत्सवी नाट्यसंमेलनाचे निमंत्रणच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला दिले.