‘त्या’ सदस्यांची नावे फायनल करण्याचे मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपालांच्या मार्फत विधानपरिषदेवर नियुक्त केल्या जाणा-या 12 सदस्यांची नावे अंतिम करण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (chief-minister-has-sole-power-finalize-names-members-appointed-governor) दिले आहेत.
विधानपरिषदेवर कोणत्या 12 सदस्यांना नेमायचे याची शिफारस मंत्रिमंडळाच्या वतीने केली जाते. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नावांच्या बाबतीत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे. राज्यपालांकडे जोपर्यंत नावांची यादी जाणार नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणतेही तर्कवितर्क लढविण्यात काहीही अर्थ नसल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

काँग्रेसने त्यांच्या चार नावांची यादी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे दिल्याचे सांगितले जात आहे. तरीही काँग्रेसकडून मात्र याविषयी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगलीला रवाना झाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बैठकीनंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे थोरात यांनी काँग्रेसच्या चार लोकांची नावे मुख्यमंत्र्यांकडे दिली अशी चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात काँग्रेसची नावे अद्याप दिल्लीवरून आली नसल्याचे सांगितले जात आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची नावे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत निश्चित होतील. तर शिवसेनेची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः निश्चित करतील.

… हा विषय सोमवारी चर्चेला
शुक्रवार ते रविवार तीन दिवस मंत्रालयाला सुट्टी आहे. त्यामुळे हा विषय आता थेट सोमवारी चर्चेला येईल. सोमवारी कदाचित मुख्यमंत्र्याच्या वतीने बारा सदस्यांच्या यादीचे पत्र राज्यपालांकडे पाठवले जाईल, असे सांगण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 जागांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. नावांबाबत गुप्तता पाळली जात आहे.