देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘CM ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे अमेरिकेपासून काश्मीर-कन्याकुमारीपर्यंत फिरून आले पण महाराष्ट्रातील प्रश्नावर काहीच समाधानकारक बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकातील भाषणासारखे वाटत होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अद्यापही लक्षात आले नाही. वीजजोड तोडण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. तसेच चीनसमोर आला की पळे हे मुख्यमंत्र्यांचे विधान भारतीय सैनिकांचा अपमान करणारे असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांच्या भाषणानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलले. सत्य काय ते त्यांना माहिती आहे. खोट बोला पण रेटून बोला अशी मुख्यमंत्र्याची भूमिका दिसली. शिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला. संघाचे संस्थापक हेडगेवार हे स्वत: स्वातंत्र्यसैनिक होते. आमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री हे सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, हे कुठले हिंदुत्व असा सवालही फडणवीस यांनी केला आहे.