मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा ! दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार 50-50 हजार रूपये मोबदला

दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीच्या लोकांसाठी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीत कोरोनाने जीव गमावणार्‍यांच्या प्रत्येक कुटुंबाला 50-50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल. सोबतच त्यांनी म्हटले की, जर एखाद्या परिवारात काम करणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला दर महिना 2500-2500 रुपयांची पेन्शन दिली जाईल.

2500 रुपयांची पेन्शन
सीएम अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, जर एखाद्या घरात एखाद्या मुलाच्या आई-वडीलांचा कोविडमुळे मृत्यू झाला तर त्या मुलाला दर महिना 2500 रुपयांची पेन्शन 25 वर्षाच्या वयापर्यंत दिली जाईल. मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल.

10 किलो फ्री रेशन
यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेशन कार्डधारकांना या महिन्यात 10 किलो फ्री रेशन देण्याची घोषणा केली. सोबतच त्यांनी म्हटले की, विना रेशनकार्डवाल्या गरीबांना सुद्धा मोफत रेशन दिले जाईल.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आतापर्यंत 14,02,873 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यापैकी 13,29,899 लोक बरे झाले आहेत आणि 22,111 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यावेळी 50,863 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज शहरात 4482 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत आणि 265 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 9403 रूग्ण बरे झाले आहेत.