मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल 

पणजी : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज (बुधवार दि- 6 फेब्रु.) गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ते उपचार घेत होते. दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत.

गेल्या गुरुवारी गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर मनोहर पर्रीकर हे दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल झाले. त्यांना आरोग्याच्या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दरम्यान गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मनोहर पर्रीकर हे रुग्णालयात उपचार घेत होते. या पाच ते सहा दिवसात त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिका-याने त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सत्रांनीही याबाबत माहिती देताना पूर्वीच्या तुलनेत मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे सांगितले. दरम्यान, मनोहर पर्रीकरांना भेटण्यासाठी एम्समध्ये जे खासदार गेले होते, त्यांच्याशी त्यांनी चांगल्या प्रकारे संवाद साधला असेही समजत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता त्यांची प्रकृती बरी असल्याचे समजत आहे.