… म्हणून आता मंत्रालयात दररोज कामकाज सुरू राहणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील असल्याने आता आठवडाभर मंत्रालय सुरु राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते दररोज मंत्रालयात उपस्थित राहत आहेत. ठाकरे सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा पायंडा पाडला आहे.

युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेत आल्यानंतर मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. मनोहर जोशी हे मुळचे रायगड जिल्यातील असले तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द मुंबईत राहिल्याने ते मुंबईचे मुख्यमंत्री असल्याचे मानले जात होते. सत्तेच्या शेवटच्या पाच महिन्यात जोशी यांच्या जागी नारायण राणे यांची नियुक्ती करण्यात आली. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आहेत आणि आजपर्य़ंत त्यांनी ग्रामीण भागाची नाळ सोडलेली नाही.

महाराष्ट्रात 1999 मध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात आले. आघाडीच्या 15 वर्षाच्या सत्तेत विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भुषवले. विलासराव देशमुख हे लातूर, सुशीलकुमार शिंदे सोलापूर, अशोक चव्हाण नांदेड तर पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा कारभार पहात असताना आपल्या मतदारसंघाकडे देखील लक्ष द्यावे लागत होते.

आघाडीच्या काळात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्री मंगळवार-बुधवार किंवा जास्तीत जास्त गुरुवारपर्य़ंत मंत्रालयत उपस्थित रहात होते. मंत्री आठवड्यातील तीन दिवस उपस्थित असल्याने आणि अन्य दिवशी मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित नसल्याने मंत्रालयात शुकशुकाट असायचा. त्याचा परिणाम कामकाजावर होत होता. कामे संथ गतिने होत होती.

2014 मध्ये पुन्हा युतीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. फडणवीस हे नागपूरचे असल्याने त्यांना अनेकवेळा नागपूर, विदर्भ आणि राज्याच्या दौऱ्यावर जावे लागत होते. त्यांच्या कार्यकाळात मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होत होती. त्यामुळे बुधवारपासून मंत्रालय ओस पडत होते. हे चित्र पाच वर्ष पहायला मिळाले. मात्र, आता मुख्यमंत्री मुंबईचा असल्याने मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरु राहणार असल्याने कामाला गति येण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/