पदवीधरांसाठी मोठी संधी ; शासकीय यंत्रणेत काम करा, मानधन ३५ हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकांना प्रशासनात काम करायची इच्छा असते. मुख्यमंत्री २०१९ फेलोशिप ही अशांकरिता उत्तम संधी आहे. नुकतेच या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षांच्या मध्ये असायला हवे. तसेच याकरिता किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक असते. तसेच कोणत्याही शाखेचे पदवीधर , पदव्युत्तर पदवीधर यात प्रवेश घेऊ शकतात. याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून आहे.

दरमहा ३५ हजार रुपये फेलोशिप

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ११ महिन्यांच्या कालावधी आहे. उमेदवाराला दर महिन्याला ३५ हजार रुपये फेलोशिप मिळेल. नामांकित संस्था, उद्योग वा सार्वजनिक उपक्रम संस्थेतील कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असलेले तरुण या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतील.

आयआयटी, आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयं, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना कार्यक्रमानंतर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करता येईल किंवा उच्च शिक्षण घेता येईल.

हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीत अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत राबवण्यात येत आहे. या ११ महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणं, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, समाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीत आणि धोरण निर्मितीत त्यांना सहभागी करून घेणं, हा उद्देश आहे.