महाराष्ट्रातील लोकांंना परदेशातून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : आ. सिद्धार्थ शिरोळे

पुणे – परदेशात अडकलेल्या आपल्या महाराष्ट्रियन बांधवांना मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी कळकळीची विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. कोरोनाचे संकट जगभर उदभवले आहे. त्यातून अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. शिक्षण संस्था बंद पडल्या आहेत. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याची झळ संयुक्त अरब अमिरात आणि अन्य देशातील महाराष्ट्रियन बांधवांना बसलेली आहे. त्यात विद्यार्थी, नोकरी गमावलेले कामगार, ज्येष्ठ नागरिक यांना या संकटाची झळ बसलेली आहे. त्यांनी भारतात – मायदेशी परत येण्याची इच्छा वेळोवेळी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाशी आणि राज्यातील अन्य सरकारी यंत्रणांशी संपर्क साधला. परंतु, दुर्दैवाने मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परदेशात अडकलेले आपलेच बांधव आहेत आणि ते महाराष्ट्र सरकारकडून सोडवणुकीची अपेक्षा करीत आहेत. याउलट महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांचा अनुभव पाहीला तर त्या-त्या राज्यसरकारांनी परदेशात अडकलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांशी संपर्क साधून त्यांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. महाराष्ट्र सरकार मात्र याबाबत काहीच हालचाल करत नाही याचा मला खेद वाटतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, त्यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालावे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रियन जनांशी संवाद साधावा, त्यांना दिलासा द्यावा आणि भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रियन नागरिकांच्या संपर्कात मी सतत आहे. त्यांना भारतात परत यायला मिळावे यासाठी मी प्रयत्नात आहे. लवकरात लवकर ते मायदेशी येतील याचा मला विश्वास वाटतो असे शिरोळे यांनी म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like