मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार, असे असेल नियोजन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना विरोधकांकडून सातत्याने मुख्यमंत्री फिरत नसल्याची टीका करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (३० जुलै) पुण्याचा दौरा केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑगस्टच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड परभणी, जालना, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद मध्ये येऊन आढावा घेण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात सर्वात जास्त रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात साडेतेरा हजार कोरोना रुग्ण सापडले असून, ४६४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्‍सिंगच्या माध्यमातून सतत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर व प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर नियंत्रण ठेवून होते. तसेच चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या कोविड -१९ रुग्णालयाचे व कोरोना चाचणी प्रयोग शाळेचे उद्घाटन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले होते.

जानेवारीत मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी भेट देत, बिडकीन येथील पाचशे एकर जागेत फूड पार्क उभा करण्याची घोषणा त्यांनी केली होती. या मराठवाडा दौऱ्यात या फूड पार्कचे भूमिपूजन उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे.