ठाकरे सरकारमधील मंत्रीच बनले ‘बातमी’दार, मुख्यमंत्री मंत्र्यांवर ‘नाराज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेण्यापूर्वीच त्याची माहिती बाहेर जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीमंडळातील काही सहकारीच मंत्रिमंडळात झालेल्या विषयांच्या चर्चेची माहिती बाहेर देत असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून आले.

त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना केली आहे. मात्र, तीही बातमी मंत्र्यांनी फोडली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या दिग्गज नेते सहभागी आहेत. पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारमध्ये यातील जवळपास सर्व जण मंत्री होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातील चर्चांची बाहेर वाच्यता करु नये, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. असे असताना या तीन पक्षातील मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याने मंत्रिमंडळातील अनेक विषयांवरील चर्चा त्यावर निर्णय होण्यापूर्वीच काही जण चॅनेलमधील आपल्याशी जवळ असलेल्या पत्रकारांना देऊ लागले आहेत.

त्यामुळे मंत्रिमंडळाचे निर्णय परस्पर बाहेर येऊ लागले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळातील बातम्या बाहेर फोडू नका. त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहे. तसेच सरकारला बदनामीला सामोरे जावे लागत आहे. असे सांगत त्यांनी मंत्र्यांना सूचना केल्या आहेत. मुख्य म्हणजे अशा सूचना केल्या आहेत, हेही या मंत्र्यांनी जाहीरपणे बाहेर सांगितले असल्याने आता त्याचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे.