मुख्यमंत्री ठाकरेंचा पुण्याचे महापौर मोहोळ यांना फोन, दिला ‘हा’ सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. मुरलीधर मोहोळ हे सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिथेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याही प्रकृतीची विचारपूस केली. मोहोळ हे कोरोना काळात उत्तम काम करत आहेत. त्यांचे कौतुक करताना आता प्रकृतीची काळजी घ्या व लवकर बरे व्हा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुणे पालिकेत भाजपची सत्ता असताही मुख्यमंत्र्यांनी आस्थेने चौकशी केल्याने मुरलीधर मोहोळ हरखून गेले आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजाराच्या वर गेली आहे. सध्या राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची सर्वच यंत्रणा अहोरात्र झटत आहे. त्यात पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ पहिल्यापासून या लढ्याचे नेतृत्त्व करत आहेत.