‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही’ : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फक्त खुर्ची महत्त्वाची आहे. त्यांना शेतीमधलं काहीही कळत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं काहीही पडलेलं नाही,. मोदी सरकारनं मंजूर केलेल्या 3 कृषी कायद्याचं स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळं, बहिरं झालं आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि 13 ऑक्टोबर) केली.

दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या 3 कृषी कायद्याचं स्वागत करण्यात आलं. भाजप किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राहुल गांधींनी ट्रॅक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय समजत नाही. काही दिवसांपूर्वी या कायद्याला पाठींबा देणाऱ्यांना दिल्लीवरून मॅडमचा रेटा आल्यानं केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. कायद्याला स्थगिती देता येत नाही.”

पुढं बोलताना पाटील म्हणाले, “मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिती का देत आहेत ? सेस गोळा करणं बापाच पेंड आहे काय ? कृषी उत्पन्न बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचं काम आहे. सेस बंद होणार असल्यानं त्यांच्या पोटात दुखत आहे.”