पावसामुळं लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त 3800, शेतकरी संतप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेत जमिनीत पाणी शिरले, पूरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतकऱ्यांवर डोंगराएवढे संकट कोसळलं, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसराचा पाहणी दौरा केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी नुकसान झालेल्या शेकऱ्यांना धानादेशाचे वाटप केले. पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वकाही हिरावून घेतलं, सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती केवळ 3800 रुपयांचा धनादेश दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, 3-4 लाखांचे नुकसान झालंय, एवढा तरी चेक कशाला दिलाय ? तुमचा चेक घेऊ जा अशा शब्दात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच कालावधीत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 16 जणांचा बळी गेला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. उपमुख्यमत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा काला.

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर दौऱ्यावर नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोहचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी दिलेली निवेदने स्विकारली.

You might also like