मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व मंत्र्यांना समान न्याय देतात : जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्यांच्या विधानांना किती गांभीर्याने घ्यायचे. भाजप मित्र पक्षांना कशी वागणूक देतात हे सर्वांना माहिती आहे. शिवसेनेसोबत सत्तेत असताना त्यांच्या मंत्र्यांना कशी वागणूक द्यायचे, हे जगजाहीर आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व मंत्र्यांना समान न्याय देतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगाकर यांच्या प्रचाराच्या समन्वयासाठी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. याप्रसंगी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे उपस्थित होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष काँग्रेसला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. यावर जयंत पाटील यांनी वरील रोखठोक उत्तर दिले. महाविकास आघडीचे पाचही मतदारसंघात उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचे नियोजन झाले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातही सर्व तालुक्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष उद्यापासून एकत्रित प्रचारात उतरणार आहेत. पाचही मतदारसंघांतून महाविकास आघाडीचे दहा आमदार निवडून येतील, असा दावा पाटील यांनी यावेळी केला.

कोरोनाने आधीपासूनच देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे पूर्वीपासून पुण्यासारख्या औधोगिक नगरीचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी खाली घसरले आहे. केंद्राची धोरणे याला कारणीभूत असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग बेरोजगार झाला आहे. या परिस्थितून राज्याला बाहेर काढण्यासाठी आघाडी शासन कटिबद्ध आहे, असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.