फडणवीस सरकारला जे जमलं नाही ते ठाकरे सरकार करून दाखवणार, मराठी भाषेवर मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळेत सक्तीचा कायदा लवकरच लागू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या पत्रावर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. डॉ. निलम गोऱ्हे यांनी 20 जून 2019 रोजी विधानपरिषदेत राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्याबाबत त्यांनी प्रश्न मांडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करु असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कायदा झाला नाही. त्यावर अखेर उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषा सर्व शाळेत सक्तीने शिकवण्याचा कायदा अंमलात आणला जावा यासाठी गोऱ्हे यांनी तात्काळ बैठक आयोजित करण्याबाबतचे पत्र दिले होते. यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ प्रशासनास कायदा पुढील अधिवेशनात यावा आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्याची सुचना दिली आहे. मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळेत सक्तीची करण्याबाबत कायदा मसुदा ऑगस्ट 2019 मध्ये विधी व न्याय विभागाकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेने सोपवला होता. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करुन हा कायदा मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर होईल यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषामंत्री हे तात्काळ पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
पत्रातील अन्य मुद्दे

कायद्याच्या भाषेतील अवजड कठीण शब्दांचे योग्य अर्थ न उमगल्याने न्याय्य हक्कांपासून रहावे लागते. त्यामुळे न्यायालयीन व शासन पातळीवर मराठी भाषेचा सहज सोप्या स्वरुपात वापर वाढणे आवश्यक आहे. उदा. आरोग्य विभागात वापरला जाणारा मेडिकल प्रोटोकॉल अद्यापही मराठी भाषेत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात नर्स व हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या लोकांना याबाबत अद्याप ज्ञान नाही असे म्हणावे लागले. तसेच विकास नियंत्रण नियम (डीसी रुल्स) बाबत हीच परिस्थिती आहे.

मराठी भाषेत उपलब्ध असलेले सर्व साहित्य इंटरनेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच नवसाहित्यिकांनाही उत्तेजना मिळावी, त्यांचे लेख छापून यावेत यासाठी इनटरनेटच्या माध्यमातून पावले उचलणे आवश्यक आहे. गुगल, विकिपिडीया व तत्सम माध्यमांचा वापर करून मराठीचा प्रचार व प्रसार करण्यात यावा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/