Uddhav Thackeray : ‘कोरोना’विरुद्ध ’ही’ मोहीम आहे खास, CM ठाकरेंनी दिला मोठा संदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत 34 जिल्ह्यांमध्ये 8 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. स्थानिक प्रशासनाकडून राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सुमारे 24 लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्याची माहिती ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज आढावा बैठकीत दिली.

राज्यभरात सुरू असलेल्या या उपक्रमाचा सीएम उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

जास्तीत जास्त लोकांना सहभागी करा

या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी हा उपक्रम आणखी परिणामकारक करा, जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घ्या, अशी सूचना केली. या उप्रकमात व्यापक आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे.

दररोज अहवाल तपासा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी माझे घर, माझी जबाबदारी योजनेबाबत उपस्थितांना सूचना सांगितले की, सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधा. तसेच सर्व्हेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे. ही मोहीम केवळ शासन राबवत नसून ही मोहीम लोकांचीही आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. यादृष्टीने जनजागृती करा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

24 लाख कुटुंबांच्या भेटी झाल्या

या उपक्रमाची माहिती देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, जिल्हा परिषदांना 1 कोटी 84 लाख कुटुंबाना भेटीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी 24 लाख कुटुंबांच्या भेटी झाल्या असून 13 टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयचे 15 हजार 392 रुग्ण तर कोविडचे 6 हजार 938 रुग्ण आढळले आहे. सहव्याधी असलेले 2 लाख 6 हजार 211 रूग्ण आढळले आहेत.

पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण

या उपक्रमांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून 21 टक्के, नाशिक भागामधून 10 टक्के, पुणे 18 टक्के, कोल्हापूर 15 टक्के, औरंगाबाद 12 टक्के, लातूर 13 टक्के, अकोला 13 टक्के आणि नागपूर भागामधून 6 टक्के इतक्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे, असे आजच्या आढावा बैठकीत सांगण्यात आले.