‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही मक्केला जावं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला महंत परमहंस दास यांच्याकडून विरोध केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी आरोप केला आहे की त्यांनी राम भक्तांना धोका दिला आहे. ते म्हणाले, ‘सत्तेसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि राम भक्तांना धोका दिला.’ ते आक्रमक होऊन म्हणाले उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही आणि प्रभू श्री रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. ते जर अयोध्येत आले तर मी स्वत: त्यांचा रस्ता रोखणार’, असे त्यांनी स्पष्ट केले.

महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मक्का येथे जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा राजकीय स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्यांनी अयोध्याऐवजी मक्का येथे जायला हवं. तसेच ते पुढे असं देखील म्हणाले की, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्तानाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली होती, कारण जगात हिंदूचा स्वत:चा इतर कोणताही देश नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेचं गठन नेत्यांनी केलं आणि भारताला एक हिंदुराष्ट्र बनवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं’.

पुढे परमहंस दास यांनी स्पष्ट केले की, ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की आम्ही शिवसेनेला कधीच काँग्रेसमध्ये जाऊ देणार नाही. मात्र सत्ता उपभोगण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा वगळला आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना अयोध्येत येण्याची काही गरज नाही. काहीही झाले तरी उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करुन रामाचं दर्शन घेतले जाऊ देणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.