कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 17 जानेवारी : हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले, कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच.

महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणार्‍या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आज हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. सीमा प्रश्नामध्ये सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा!, असे एका ट्विटमध्ये म्हटलंय.

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक व सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्र राज्यात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणाराय. त्यासाठी आम्ही एकजूट व कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन, असे दुसर्‍या एका ट्विटमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही दोन्ही ट्विट्स केलीत.

कर्नाटकमधील बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये दिलेले बलिदान कदापि वाया जाणार नाही, जोपर्यंत बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलंय.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.