मुख्यमंत्र्यांनी ‘महापोर्टल’ बद्दल तात्पुरता घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापरीक्षा पोर्टल विरोधात अनेक तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तसेच, त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइन घेण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.7) दिले आहेत.

माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. त्यावळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा झाली.

बैठकीतील चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रार धारकांसोबत आठवड्याभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीमधील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात येतील. तसेच पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून त्रुटी पूर्ण झाल्यानंतर या परीक्षा पुन्हा पोर्टलद्वारेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करण्याची मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मागील सरकारने सुरु केलेले हे महापोर्टल बंद करून पुर्वीप्रमाणे नोकर भरतीसाठी परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती.

Visit : Policenama.com