PM मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात राज्यपाल, मुख्यमंत्री कोणीही राहणार नाही उपस्थित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी (दि. 28) पुणे दौ-यावर आहेत. मात्र, पुण्यात त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsing koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यापैकी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. पंतप्रधान कार्यालयातून (PMO) तशा सूचना दिल्याचे समजते. पंतप्रधान कोरोना काळात अल्प कालावधीसाठी पुणे दौरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कोणीही उपस्थित राहू नये, असा निरोप प्रशासनाला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजशिष्टारानुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतात. पण यावेळी कोणीही उपस्थित राहू नये, अशा पीएमओकडून सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदी यांच्या स्वागतास राज्यपाल आणि मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.

दिलीप वळसे पाटील स्वागत करतील…

अजित पवार हे देखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी राहणार नाहीत. पवार यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील स्वागत करतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. शरद पवार यांचा ही तुर्तास बारामती येथे नियोजित कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या कार्यालयातून दिली आहे.

दरम्यान पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (Serum Institute Pune) कोरोना लसची निर्मितीचे काम सुरू आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागले आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने दौ-याची तयारी पुर्ण केल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

कसा असणार आहे पंतप्रधानांचा पुणे दौरा…

28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 25 मिनिटाने अहमदाबाहून पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते थेट सीरम इनस्टिट्यूटला हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05 मिनिट ते 2 वाजून 05 मिनिट या एक तासांच्या कालावधीत ते सीरम इनस्टिट्यूटला भेट देतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतील. नंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटानी पुणे विमानतळावरून तेलंगाणाकडे रवाना होतील.

You might also like