साईबाबांबद्दलचा ‘हा’ उल्लेख खटकला, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर शिर्डीकर ‘नाराज’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – साईबाबांनी हयातीत कधीही जन्मस्थळ, जात, धर्म उघड केला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असा उल्लेख केल्याने शिर्डीकर आणि साईभक्त नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला आहे.

यापूर्वी राष्ट्रपतींनी साईसमाधी शताब्दी सोहळ्यात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर नाराज झालेल्या शिर्डीकरांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीच थेट साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने शिर्डीतील जनता आणि साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पाथरीच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करणे आक्षेपार्ह असल्याचे ग्रामस्थांचे आणि साईभक्तांचे म्हणणे आहे. लवकरच ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणि शिर्डीतील नागरिकांचा आक्षेप असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री साईभक्त आहेत. त्यांनी शिर्डीच्या नागरिकांच्या आणि साईभक्तांच्या भावना जाणून घ्यावात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. यासंबंधीची भूमिका गावकरी शनिवारी जाहीर करणार आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बोलताना साईबाबांचे जन्मगाव पाथरी असा उल्लेख करून पाथरीच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला असल्याचे सांगितले. तसेच लवकरच भूमिपूजन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावर शिर्डीतील ग्रामस्थांसह साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. साईबाबांनी आपल्या हयातीत भक्तांनी अनेकदा विचारूनही आपले नाव, जात, धर्म कधीही उघड केली नाही. हिंदू त्यांना संत तर मुस्लिम त्यांना पीर समजतात. साईबाबा कोणत्या जातीचे आहेत, ते कोठून आले याबाबत साईबाबांनी आपल्या हयातीत कोणाला सांगितले नाही. अधिकृत माहिती साईसतचरित्रातच आहे. मात्र, मुख्यमंत्री साईभक्त असतानाही त्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून नवा वाद निर्माण केला असून त्यांना साईभक्तांच्या संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/