दुष्काळी भागात एपीएलधारकांना (APL) बीपीएल (BPL) दरात धान्य देणार : मुख्यमंत्री

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अनेक भागातील जनता दुष्काळाशी सामना करत आहेत. राज्यात ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहिर केल्यानंतर नोंव्हेंबरमध्येच केंद्र सरकारला राज्यातील आकडेवारी पाठविण्यात आली. राज्याला भरीव मदत मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री व कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीला भेटलो आहे. लवकरच दुष्काळी भागाला केंद्राकडून भरीव मदत मिळणार आहे. दुष्काळी भागासाठी बी.पी.एल.च्या दरात ए.पी.एल. शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध करून देणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथे केली.

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल (दि.२६) दोंडाईचा येथे १६ कोटी रूपये निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या नगरपरिषद प्रशासकिय इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, धुळे जिल्हयासह शिंदखेडा तालुक्याला सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागतो. म्हणून सुलवाडे जामफळ योजनेच्या कामासाठी भरीव असा निधी मंजूर करून दिला आहे. जमिनीचे भूसंपादन प्रगतीत असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे, याशिवाय प्रकाशा बुराई उपसा जलसिंचन योजनेच्या कामासाठी देखील भरीव निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खान्देशला पूर्वी सिंचन प्रकल्पांसाठी निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही खान्देशाला जलसंपदा मंत्रीपद दिले आहे. त्यांच्या माध्यमातून खान्देशात सिंचनासाठी मोठया प्रमाणावर निधी मिळत असल्याचे यावेळी नमुद केले.

कांदा उत्पादकांसाठी २०० रूपये क्विंटलप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय अतिरिक्त अनुदानासाठी केंद्र सरकारकडे देखील विनंती करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले.

ना.जयकुमार रावल म्हणाले की, पूर्वी धुळे जिल्हयात मुख्यमंत्री क्वचित येत होते, पंरतू प्रत्यक्ष जनतेत जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा शहराला तिसऱ्यांंदा भेट दिली आहे. प्रकाशा बुराई उपसा जलसिंचन योजना, सुलवाडे जामफळ उपसा योजनेच्या कामाबाबत त्यांनी मागणी केली. दोंडाईचा रेल्वेस्टेशनवर कलकत्ता व नागपूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाडयांना थांबा देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच १२ बलुतेदार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी ना.जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सुत्रसंचालन डी.एस.गिरासे यांनी केले.