PM मोदींपेक्षा ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळतो जास्त पगार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जर तुम्हाला असं वाटत असेल की, देशात सर्वात जास्त पगार हा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आहे तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार असतो. इतकंच नाही तर खासगी क्षेत्रात दिला जाणारा पगार हा जास्त असतो. आज याच बद्दल आपण सविस्त माहिती घेणार आहोत. पीएम मोदींचं वेतन किती आहे हेही आज आपण जाणून घेणार आहोत.

खासगी क्षेत्रात अधिक पगार

देशात खासगी क्षेत्रातच सर्वात जास्त वेतन दिलं जातं. सरकारी नोकर आणि कर्मचाऱ्यांना तुलनेत कमी वेतन असतं. परंतु त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मोठ्या प्रमाणात असल्यानं ही रक्कम कमी नसते. भारतात सीईओ पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जास्त पगार असतो. यात टेक महिंद्राचे सीईओ सी पी गुरनानी वार्षिक 165 कोटी रुपये एवढा पगार घेतात. जर तुम्ही भारताच्या पंतप्रधानांचा पगार ऐकला तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही, परंतु धक्का मात्र नक्कीच बसेल. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधानांचा पगार हा मंत्र्यांइतकाच होता. परंतु कायद्यात बदल करून यात वाढ करण्यात आली.

मोदींना किती वेतन मिळतं ?

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीला मंत्र्यांचा पगार हा दरमहा 3000 रुपये ठरवला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:लाही तितकाच पगार घेण्याचा निर्णय घेतला. सध्या भारताच्या पंतप्रधानांना दरमहा 1 लाख 60 हजार रुपये एवढा पगार मिळतो. त्यांच्यापेक्षा देशातील काही राज्यातील मुख्यमंत्र्यांचे पगार जास्त आहेत. अनेक राज्यातील मुख्यमंत्री हे महिन्याला 4 लाख रुपये एवढा पगार घेतात. काही राज्यातील मुख्यमंत्री मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कमी वेतन स्विकारतात.

‘या’ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार

सर्वाधिक पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 4 लाख 10 हजार एवढा मासिक पगार मिळतो. सर्वात कमी पगार त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांना मिळतो. देव 1 लाख 5 हजार एवढा मासिक पगार घेतात. तेलंगणानंतर दिल्ली आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सर्वात जास्त वेतन मिळतं. येथील मुख्यमंत्र्यांना अनुक्रमे 3 लाख 90 हजार आणि 3 लाख 21 हजार एवढा पगार मिळतो.

या 3 राज्यांव्यतिरीक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा 3 लाखांहून अधिक आहे. सोबतच अनेक राज्यात मुख्यमंत्र्यांचा पगार हा राज्यपालांपेक्षा अधिक आहे.