सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भरदिवसा खून करणारा मुख्य सुत्रधार गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सैनिक विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली यांचा भरदिवसा बालेपीर भागात कुकरीने भोसकून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घटना घडल्यापासून फरार झाला होता. तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली ओळख लपवून वावरत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला सोमवारी (दि.7) चऱ्हाटा फाट्याजवळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, बालेपीर भागातील व सैनिक विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक सय्यद साजेद अली यांच्या खुनातील मुख्य आरोपी गुज्जर खान हा खुन झाल्यापासून फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. त्याला अटक करण्यासाठी बीड पोलिसांनी चार पथके विविध राज्यात रवाना केली होती. गुज्जर हा  बीडमार्गे हैद्राबाद तेथुन दिल्ली नंतर अजमेर, अमाउंट अबु तेथुन मेहसणामार्गे गुजरातच्या अहमदाबादला गेला असल्याचे पोलिसांना समजले. तसेच तो विदेशात फरार होणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाली.

त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी  विविध कंपनीचे सहा सीमकार्ड वापरत होता. त्याच सीमद्वारे तो बीडमधील अनेकांना खंडणीची मागणी करत होता. सोमवारी तो खंडणीची रक्कम घेण्यासाठी चऱ्हाटा फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राऊत आणि दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने चऱ्हाटा येथे सापळा रचून गुज्जर खानच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोका अंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला असुन पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. बीड शहरासह अनेक जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे असलेल्या गुज्जर खान व त्याच्या टोळीतील काही जणांवर मोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

You might also like