Mission Shakti : वैज्ञानिकांचं कर्तृत्व श्रेय त्यांनाच घेऊ द्या ; राज ठाकरे यांची मोदींवर खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश ठरला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. मात्र नरेंद्र मोदींवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.

राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले आहेत की , ‘एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला त्याबद्दल वैज्ञानिकांचं नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण पंतप्रधान म्हणून श्री नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज ? वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे त्यांना प्रसिद्धी मिळू द्या. ‘

आपल्याकडे हे तंत्रज्ञान आधीच होते, फक्त चाचणी केली नव्हती- पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मिशन शक्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी अंतरिक्ष आयोगाचा सहा वर्ष सदस्य होतो. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून सहा वर्ष अंतरिक्ष विभागाचे काम जवळून पाहिले आहे. आजची उपलब्धी मोठी आहे, त्याबद्दल अंतरिक्ष वैज्ञानिकांचे अभिनंदन केले पाहिजे. मिसाईल तंत्रज्ञानाचा जन्म इस्त्रोतून झाला. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी आज झाली आहे. आमच्या सरकारच्या काळात संरक्षण खात्याचे राष्ट्रीय सल्लागार व्ही. के सारस्वत होते, त्यांनी २०१२ साली भारताने अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती, याची आठवणही पृथ्वीराज यांनी यावेळ करुन दिली. त्यामुळे आपल्याकडे हे तंत्रज्ञान आधीच होते, फक्त त्याची चाचणी केली नव्हती असेही ते म्हणाले. तेव्हा चाचणी घेतली नाही किंवा केली असेल तर ते जाहीर केली नाही. दोन्ही गोष्टी आहेत, त्याबद्दल सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.