थेऊरमध्ये चिकुनगुनिया सदृश आजाराचे रुग्ण आढळले; डासांची संख्या वाढली

थेऊर ,पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाशी लढा देत असताना थेऊरमध्ये चिकुनगुनिया सदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून, याकडे दुर्लक्ष करणं महागात पडणार आहे. पावसाळा संपल्यानंतर थंडीची चाहूल लागताच येथे डासांची संख्या झपाट्याने वाढली असून, डेंगी व चिकुनगुनिया सदृश आजाराने आपले तोंड वर काढले आहे.

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे मागील वर्षी दिवाळीच्या काळात डेंगीची लागण झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे याही वर्षी पुन्हा तिच परिस्थिती निर्माण होते का याची भीती वाटते. आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असले तरीही याकडे डोळेझाक करून चालणार नाही.गावाला चोहोबाजूंनी मुळा-मुठा नदीने वेढा घातला असल्याने डासांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. स्थानिक यामुळे बेजार झाले आहेत.

यावर ग्रामपंचायतीच्या वतीने धुरळणी करणे अपेक्षित आहे, परंतु आणखी तशी व्यवस्था झाल्याचे दिसत नाही.

यावर ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की आपल्या धुरळणी मशिन नादुरुस्त आहेत, परंतु आज मोठ्या मशिनची व्यवस्था केली आहे. येत्या चार दिवसांत सर्व भागात फाॅगिंग (धुरळणी) करण्यात येईल. आज सायंकाळी गावठाणात बहुतेक ठिकाणी धुरळणी झाली आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याचा साठा करून ठेऊ नये, तसेच पाण्याच्या टाक्या घट्ट झाकणाने बंद ठेवाव्यात असे आवाहन केले.

याविषयी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. मेहबूब लुकडे यांच्याकडे संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की गावात संदिग्ध रुग्ण आढळून आल्याने आरोग्य कर्मचारी यांनी सर्वेक्षण केले आहे. या रम्यान काही घरात डासांचे लारवा आढळले नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. यावेळी सर्व तयारी केली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.