एखाद्या महामारीपेक्षा कमी नाही चिकनगुनियाचा आजार ! जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन – चिकनगुनिया (Chikungunya) हा रोग सर्वात आधी आफ्रिकन देशातील तंजानियात निदर्शनास आला होता. यानंतर हा रोग जगभरात पसरला. दरवर्षी हजारो लोक यामुळं दगावतात. याचाही संसर्ग एका विषाणूपासून होतो. गेल्या काही वर्षांपासून सार्स, बर्ड फ्लू, डेंग्यू अशा रोगांच्या पक्तींतच एक चिकनगुनिया आला आहे. एडीस जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकनगुनिया (Chikungunya) हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो.

काय आहेत याची लक्षणं ?

1) सलग दोन-तीन दिवस ताप
2) अंगावर, विशेष करून पाठ, पोट कंबर या भागांवर पुरळ येतं.
3) हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात.
4) पायांचे घोट, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात जास्त त्रास होतो.
5) साधं चालणं, पायांची मांडी घालणं हेही वेदनादायक होतं.
6) हा आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हायपाय दुखणं सुरूच राहतं.
7) थकवाही कायम जाणवतो. त्यामुळं रुग्ण बरा झाला तरी काही दिवस आराम करणं गरजेचं आहे.

चिकनगुनियाची साथ साधारण 10-12 वर्षांनी येते असा या आजाराचा अनुभव आहे

चिकनगुनियाचा विषाणू एकाच प्रकारचा असल्यानं एकदा तो झाला की, त्या व्यक्तीला दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती मिळते. त्यामुळं दरवर्षी चिकनगुनियाचा प्रभाव आढळत नाही. चिकनगुनियाची साथ साधारण 10-12 वर्षांनी येते असा या आजाराचा अनुभव आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 2006 साली याची मोठी साथ आली होती. यात लाखो लोक या आजारानं घेरले गेले होते.

काय आहेत याची कारणं, कशी होती याची उत्पत्ती ?

डेंग्यू आणि चिकनगुनियाचा एडिस हा डास प्रामुख्यानं घरगुती पाणीसाठ्यात वाढणारा डास आहे. उघड्या असणाऱ्या पाणीसाठ्यात, कुंड्या, फुलदाण्या, कारंजी कूलरचे ट्रे, पक्षांना-प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. इतकंच नाही तर खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या, छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपड्या ठेवलेल्या झाकणात जर पाणी साचलं आणि सात दिवस तसंच राहिलं तरीही एडीसचा जन्म होतो.

काय आहेत यासाठीचे उपाय ?

एडीस डासाची अंडी ही पाण्याशिवाय एक वर्षही टिकू शकतात. डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.