Nashik News : मुलीचा मृत्यु सहन न झाल्याने रुग्णालयातून ‘त्या’ चिमुकलीला पळवल्याची आरोपीने दिली कबुली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – तीन दिवसापूर्वी जिल्हा शासकिय रुग्णालयातून 1 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करणा-या इसमाला मंगळवारी (दि. 16) पहाटे पोलिसांनी चिमुकलीसह ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने 2 महिन्यांपुर्वी त्याची स्वत:ची मुलगी मृत्युमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे कारण पोलिसांना सांगितले आहे. माणिक सुरेश काळे (वय 48, रा. शनीमंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा शासकिय रुग्णालयात शनिवारी (दि. 13) दुपारी एका परप्रांतीय महिलेची 1 वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपली होती. त्यावेळी आरोपीने तिचे अपहरण केले होते. दरम्यान, चिमुकली गायब झाल्यापासून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक चिमुकलीसह त्या अनोळखी अपहरणकर्त्याचा शोध घेत होते. शहरातील सर्वच परिसर आणि शक्यता असलेल्या विविध ठिकाण पोलिसांनी पिंजून काढले होते. मात्र अपहरणकर्त्याचा कोठेही मागमुस लागत नव्हता. यामुळे मुलीची आई आणि नातेवाईकांचीही चिंता वाढली होती.

मंगळवारी पहाटेच्यावेळी अपहरणकर्ता इसम जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याने जात होता. यावेळी एका पोलीसाचे त्याच्याकडे लक्ष गेले असता त्यांनी त्या माणसाला थांबविले आणि विचारपुस केली. यावेळी गुन्हे शाखा युनीट-1 चे गस्ती पथकही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी चिमुकलीसह त्या संशयित इसमालाही ताब्यात घेतले.