धक्कादायक ! वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मेळघाटात बालकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – आरोग्य केंद्रातून दुसर्‍या रुग्णालयात उपचार करण्यास नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका अडीच वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील मांजरकापडी गावात घडली आहे.सोहन सुनील पटोकर असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

मेळघाटमधील सोहन सुनील पटोकर या अडीच वर्षीय आदिवासी बालकाची प्रकृती 26 तारखेला रात्री अचानक बिघडली होती. रात्री घरगुती उपचार करून त्याच्या आई वडिलांनी दुसर्‍या दिवशी सकाळीच त्याला गौरखेडा बाजारमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी आणले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मुलावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता मुलाच्या पालकांना सांगितले. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका दीड ते दोन महिन्यापासून नादुरुस्त असल्याने या मुलाला घेऊन जाणार तरी कसे, असा प्रश्न त्या मुलाच्या पालकांना पडला. दरम्यान, काही वेळानंतर या घटनेची माहिती तेथील सरपंचांना मिळताच त्यांनी या आरोग्य केंद्रात भेट दिली. मात्रा बालकाची ढासळती प्रकृती लक्षात घेता या बालकाला सरपंचांनी त्यांच्या स्वत:च्या गाडीमध्ये घेऊन गेले व अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णवाहिकेच्या शोधात वेळ निघून गेल्याने शेवटी या अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर या मुलाचा जीव वाचला असता, असे गावकर्‍यांनी सांगितले आहे.