फटाक्यावर स्टीलचा ग्लास ठेवून पेटवला, शरीरात तुकडे घुसल्याने बालकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत मोठ्या आवाजाचे फटाके विकण्यावर आणि खरेदी करण्यावर बंदी आहे. तरीही अलीपुरमध्ये विकल्या जात असलेल्या फटाक्यांनी एका निष्पाप मुलाचा जीव घेतला आहे. नऊ वर्षांचा मुलगा फटाक्यावर ग्लास उपडा ठेवून तो फोडण्याचा प्रयत्न करत होता. पेटवल्यानंतरही फटका न फुटल्याने तो जवळ गेला आणि याचवेळी स्फोट झाला. ग्लासचे तुकडे मुलाच्या शरीरात घुसले. त्याला जवळच्या हास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस अशाप्रकारे फटाके विकरणार्‍यांचा शोध घेत आहेत.

मृत मुलाचे नाव प्रिन्स दास (9) आहे. तो कुटुंबियांसह ओम कॉलनी बख्तावरपुरमध्ये राहात होता. तो शांती निकेतन पब्लिक स्कुलमध्ये चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडिल राम रखबाल दास हे खासगी कंपनीत नोकरी करतात. तर आई बबीता देवी शेतात काम करते.

बुधवारी त्याचे आई – वडिल कामावर गेले होते. इतर मुलांप्रमाणे प्रिन्स परिसरातील एका दुकानातून फटाके घेऊन आला होता. यानंतर तो शेजारच्या मुलांसोबत रिकाम्या जागेत फटाके फोडण्यासाठी गेला. बॉम्ब फोडण्यासाठी त्याने त्यावर स्टीलचा ग्लास उपडा ठेवला. फटाका न फुटल्याने तो जवळ जाऊन पाहू लागला. इतक्यात जोराचा स्फोट झाला आणि ग्लासाचे तुकडे-तुकडे झाले. ग्लासाचे अनेक तुकडे त्याच्या शरीरात घुसले. तो जखमी होऊन त्याच ठिकाणी कोसळला. घटनेची माहिती मिळताच प्रिन्सचे आई – वडिल तिथे पोहचले आणि त्याला जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी प्रिन्सला मृत घोषित केले.

परिसरात फटाक्यावर नाही कोणताही प्रतिबंध
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, परिसरात फटाके विकण्यावर कोणतीही बंदी नाही. छोट्या टपरीवर देखील चोरून फटाके विकले जातात. घरी कुटुंबिय नसताना मुले नेहमीच अशा दुकानांमधून फटाके खरेदी करतात आणि फोडतात. अशावेळी ती अनेकदा जखमी होतात. कुटुंबियांचे म्हणणे आहे की, फटाक्यांवर पूर्णपणे बंदी असावी आणि विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.