धक्कादायक ! वडिलांच्याच टेम्पो रिक्षाखाली चिरडून बालकाचा जागीच मृत्यू , परिसरात शोककळा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमधील हातकणंगले मधिल नागाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना घडली आहे जी ऐकून तुम्हीसुद्धा नक्कीच हळहळ व्यक्त कराल. येथील रिक्षाचालक असणाऱ्या वडिलांच्या रिक्षाच्या चाकाखाली सापडून सव्वा वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. वडील घरासमोरील रिक्षा मागे घेत असताना आज (शुक्रवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

अशी घडली घटना :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील चित्तोडगडचे मूळ रहिवासी असणारे कमलेश डांगी यांचा जवळील MIDC परिसरात भेळचा गाडा (टेम्पो रिक्षा) असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, आज दुपारी कमलेश यांचे कुटुंबीय घरात जेवण करत असताना कमलेश यांनी रिक्षा टेम्पोमध्ये व्यवसायाचे साहित्य भरून टेम्पो चालू केला. त्यावेळी त्यांचा मुलगा चेतन पळत बाहेर आला आणि ठेचकाळून खाली पडला. गाडी मागे घेत असणाऱ्या कमलेश यांच्या गाडीच्या आवाजामुळे हा प्रकार लक्षात आला नाही आणि त्यांनी गाडी तशीच मागे घेतली. त्यावेळी गाडीचे मागचे चाक मुलगा चेतन यांच्या अंगावरून गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. चेतनच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून घरातील लोक आणि कमलेश बाहेर येऊन पाहतात तर रक्ताच्या थारोळ्यात बालक त्यांना दिसले. उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सदर घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील चौकशी आणि कारवाई करत आहेत. दरम्यान घटनास्थळावरील दृश्य अतिशय वेदनादायी आणि काळीज पिळवटून टाकणारे होते. स्वतःच्या हातून मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कमलेश यांचा आणि इतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता.

visit : Policenama.com