पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

शिक्रापूर : पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव ढमढेरे येथे सुरू असलेला बालविवाह रोखण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सात नातेवाईकांविरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बालविवाह संपन्न होणार आहे. याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार डाॕ. अभिनव देशमुख यांनी शिक्रापूर पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती घेऊन घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी तळेगाव ढमढेरे गावच्या हद्दीत लग्न समारंभ सुरू असलेल्या आरोह सृष्टी भीमशेत धानोरे रोड या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, एका सतरा वर्षे तीन महिने 19 दिवसांच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत असताना मिळून आले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी मुला-मुलीच्या सात नातेवाईकांविरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.