Pune News : कर्तव्यदक्ष महिला पोलिसांमुळे चिमुरडा आईच्या कुशीत, डोळ्यांतही आनंदाश्रू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रात्र थर्टी फर्स्टची …. वेळ पावणे दहाची…. गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या पदपथावरून एक लहान मूल रडत जात होते. बंदोबस्तावरील महिला पोलिसांनी मुलाला जवळ घेत समजूत काढून रडायचे थांबविले. दरम्यान, काही अंतरावर त्याच मुलाची आई डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या मुलाला शिधून देण्याची विनवी दुसऱ्या पोलिसांकडे करत होती. त्यावेळी त्या महिला पोलिसाने धीर देत दोन्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आई मुलाची भेट घडऊन आली. हा क्षण इतका भावुक होता की, वर्दीतील पोलिसांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आणले.

थर्टी फस्टच्या रात्री बंदोबस्तासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोखले चौकात पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अमृता हरबा, वैशाली कौरव, हर्षा चांदगुडे व प्रियांका राजे नेमणुकीस होत्या. एक लहान मूल पदपथावरून रडत जाताना दिसले. त्यांनी मुलाला स्वतःजवळच थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याने ‘माझे नाव मंत्र आहे, माझी आई हरवली आहे’ असे सांगितले. मात्र त्यापेक्षा जास्त त्यास काही सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्याला स्वतःजवळ थांबविले , दरम्यान, तेथून २०० मीटर अंतरावरच एक महिला रडत-रडत गोखले चौकाच्या दिशेने धावत जाताना दुसऱ्या महिला पोलिसाला दिसली. त्या महिलेने पोलिसाकडे मुलगा हरविल्याचे व त्यास शोधून देण्याची विनवणी केली. तेव्हा, महिला पोलिसाने त्यांना आधार देत, ‘तुम्ही रडू नका, तुमचा मुलगा पुढे थांबला आहे’ अशा शब्दात आधार दिला. त्यानंतर महिला पोलिस, संबंधित महिला तत्काळ पुढे गेल्या. तेव्हा पोलिस कर्मचारी अमृता हरबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेकडे त्यांच्या मुलाला सुपूर्द केले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल आनंदाश्रुने कृतज्ञता व्यक्त केली.