आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या मुलांमधील लठ्ठपणा ही समस्या खूपच वाढत आहे. यापूर्वी केवळ मोठ्यांमध्ये आढळणारा हा आजार आज मुलांमध्येही मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. घरात मोबाईल, टीव्ही, संगणक यामध्ये मुले रममाण झालेली असतात. शाळेत जातानाही मुले स्कूलबसने जातात. शिवाय शाळेतही एकाच जागी बसून रहावे लागते. त्यातच फास्ट फूड, जंक फूडची सवय असल्याने लठ्ठपणा येतो. एका संशोधनानुसार २०२५ पर्यंत मुलांमध्ये मधुमेह ७० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. असंतुलित आहार हे या समस्यांचे मुख्य कारण आहे. यासाठी मुलांना योग्य आहार देणे खूप महत्वाचे आहे.

तळलेले पदार्थ आणि जंक फूडच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊन प्रकृती बिघडते. त्यामुळे मुलांना बाहेरचे उघड्यावरील पदार्थ देऊ नये. घरच्या घरीच त्यांना पौष्टिक आहारात चमचमीत खायला देण्याचा प्रयत्न करावा. आठवड्यातून एकदा बाहेरचे पदार्थ खायला देता येतील.

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एक कप कोमट दूध अवश्य दिले पाहिजे. शक्य झाल्यास यात चिमूटभर हळदही घालावी. यामुळे मुलांच्या शरीराची हाडे आतून बळकट होतील आणि त्यांचे शरीर निरोगी राहील. हळद असलेले दूध मुलगा पीत नसेल तर दुधात मध टाकून द्या. साखर व चॉकलेटचे दूध देऊ नका. ते आरोग्यासाठी कमी फायद्याचे असते. शरीराच्या विकासासाठी फॅट्स खूप गरजेचे आहे. फॅट्समुळे लठ्ठपणा येतो, असे नाही. चांगले फॅट्स शरीराच्या संपूर्ण विकासात मदत करतात. मुलांच्या रोजच्या आहारात काही प्रमाणात तूप, बटर, काजू, बदाम आदींचा केला पाहिजे. यामुळे त्यांच्या मेंदूला पूर्ण पोषण मिळते. हे पदार्थ दुधासोबत शेक बनवून किंवा भाजून रात्री झोपण्यापूर्वी देणे फायद्याचे असते.

मुलांच्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश करावा. मुलांसाठी केळी अत्यंत गुणकारी आहेत. केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो हा समज चूकीचा आहे. केळींमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. हे घटक वाढत्या वयामध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिरव्या भाज्यांमधील फायबर शरीरासाठी खूप गरजेचे असतात. भाज्यांमध्येही पालक शरीरासाठी सर्वात लाभदायक आहे. पालकाच्या भाजीत असलेले झिंक आणि फायबर मेंदू तल्लख करतात आणि त्वचा तजेलदार बनवतात. मुलांना पालकाचे सूप, डाळ, चपाती आणि भाजी आदी कोणत्याही रूपात दररोज दिली पाहिजे.