आईला रोज मारहाण करण्याऱ्या वडिलांचा पोटच्या मुलांनीच केला खून

लातूर (बेलकुंड) : पोलीसनामा ऑनलाईन –  मंगळवारी शिंदाळावाडी येथील दोघा भावांनी वडील रोज दारू पिऊन आई बरोबर भांडण करून तिला मारहाण करतात याचा राग मनात धरून वडिलांचा खून केला.या प्रकरणी कृष्णा मच्छिंद्र गरड व त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र काशीनाथ गरड यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी शिंदाळावाडी येथील योगिता गरड यांच्या शिवारात आढळून आला. या घटनेची गावात चर्चा सुरु झाली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली तेव्हा पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

शवविच्छेदनामध्ये मयताच्या गळ्याला व मानेवर, डोळ्यावर जखमा आढळून आल्या तसेच त्या व्यक्तीचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी मयताचे वडील काशिनाथ गरड यांच्या फिर्यादीवरून कृष्णा मच्छिंद्र गरड व त्याच्या भावावर कलम ३०२, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक यांच्याकडून करण्यात येत आहे.