मुलांनी आई-बाबा, तर आई-बाबांनी मुलांच्या भूमिकेत जायला हवे : डॉ. सलील कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आई-बाबा आणि मुलांनी एकमेकांच्या भूमिका बदलून बघितल्या पाहिजेत. कधी मुलांनी आई-बाबा, तर कधी आई-बाबांनी मुलांच्या भूमिकेत जायला हवे, अशी अपेक्षा डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

ग्लोबल स्टार फाउंडेशन व इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी यांच्यातर्फे संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त नीतू मांडके सभागृह येथे ‘डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार’ तसेच आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ‘स्वरसलील’ ही गाण्याची विशेष मैफिल ग्लोबल स्टार संस्थेच्या कलाकारांनी सादर केली. यावेळी संस्थेच्या संस्थापिका सारिका दीक्षित, तेजस चव्हाण, रघुनाथ खंडाळकर, जाधवर एज्युकेशन ग्रुपचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, वूमन हाईक संस्थेच्या संचालिका सुजाता मेंगाने, चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संचालक संजय देशपांडे, प्रिया कोठारी, डाॅ.अर्चना जगताप आदी उपस्थित होते.

यंदाचा ‘डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार’ ध्वनी अभियंते श्रेयस दांडेकर यांना, ‘आदर्श शाळा पुरस्कार’ स्माईली फेस प्री स्कुल, पुणे यांना, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रश्मी पाडगावकर यांना, आदर्श शाळा पुरस्कार सीएम इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी यांना, आदर्श शिक्षक पुरस्कार रामचंद्र सकट, बेबीनंदा सकट, बाळासाहेब घोडे, मनीषा घोडे यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, की आज धावपळीमुळे आईवडील आणि मुले यांच्यातला संवाद कमी होत चालला आहे. हा संवाद वाढण्यासाठी कधी मुलांनी आईवडिलांच्या भूमिकेत, तर कधी आईवडिलांनी मुलांच्या भूमिकेत जायला हवे. आजी आजोबा आपल्या नातवाला ज्या गोष्टी सांगतात, त्या कुठल्याही पुस्तकात किंवा लिखित स्वरूपात आपल्याला मिळणार नाहीत. ध्वनिमुद्रण हे चित्रपट, संगीत, गाणी यांचा अविभाज्य घटक बनले आहे. त्यामुळे गायकांनी गायलेली किंवा संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी उत्तमरित्या मुद्रित करणे गरजेचे असते, तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहोचते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक अविनाश रसाळ यांनी, प्रास्ताविक संस्थापिका सारिका दीक्षित यांनी, तर आभार फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री दवनी यांनी मानले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like