Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसमुळं चीनमधील ‘या’ शहरात एकाच दिवशी 254 जणांचा मृत्यू, 15000 नवे संशयित

बिजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात 254 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश मृत्यू व्हायरसचा जास्त प्रभाव असलेल्या हुबेई प्रांतात झाले आहेत. याशिवाय व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून सुमारे 60 हजार झाली आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी गुरूवारी ही माहिती दिली. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, हुबेई प्रांतामध्ये बुधवारी 242 लोकांचा जीव गेला, तर यादिवशी 15 हजार नवी प्रकरणे समोर आली.

एजन्सीनुसार दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जीव गमावणार्‍यांची संख्या गुरूवारपर्यंत 1,367 झाली आहे. याशिवाय याचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 59,804 वर पोहचली आहे. चीनच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांना 31 प्रांतस्तरीय क्षेत्र आणि शिनजियांग उत्पादन आणि निर्माण कोअरकडून 15,152 नव्या प्रकरणांचा आणि 254 लोकांच्या मृत्यूचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापैकी 242 मृत्यू हुबेई प्रांतात झाले आहेत.

परदेशांमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची संख्या 440 झाली आहे. यामुळे फिलिपीन्समध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चीननंतर जपानमध्ये कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त 203 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी बहुतांश लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळल्यानंतर क्रुज जहाजात ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये दोन भारतीयदेखील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूचओ) 15 सदस्यांची टीम सध्या चीनमध्ये आहे आणि कोरोना व्हायरसच्या प्रकोपाला तोंड देण्यासाठी स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांना मदत करत आहे.

भारतातही प्रकोप, कोलकाता आणि केरळात आढळल्या दोन – दोन केस
चीननंतर कोरोना व्हायरस भारतात सुद्धा वाढत चालला आहे. असेही वृत्त आहे की, स्पाईसजेटच्या एका विमानातून कोरोना व्हायरसचा एक संशयित रूग्ण बँकॉकहून दिल्लीत पोहचला आहे. तिकडे कोलकातामध्ये थर्मल स्क्रीनिंगदरम्यान दोन पॉझिटीव्ह केसेस आढळल्या आहेत. केरळातसुद्धा तीन रूग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसबाबत सरकार गंभीर आहे. आमचे स्थितीवर लक्ष आहे. आतापर्यंत विमानतळांवर 2,51,447 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. तर 12 प्रमुख आणि 65 छोट्या बंदरांमध्ये सुद्धा स्क्रीनिंग केली जात आहे.

You might also like